सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम

मजरूह लिख रहें है वो, अहल-ए-वफा़ का नाम
हमभी खडे हुवे है, गुनहगार की तरह
हम है मतां-ए-कुचा ओ, बाजार की तरह
उठती है हर निगाह, खरी़दार की तरह

खरंतर असरार हुसेन खान उर्फ मजरूह सुलतानपुरी यांच्याबाबत लिहायचे ठरवले आणि पुर्णपणे ब्लँक झालो. असं मी खाजगीमधे बोलताना खुप बोलू शकेन पण ईंटरनेटवर त्यांच्याबद्दल ईतकी माहिती उपलब्ध आहे की त्यापेक्षा वेगळं आणखी काय लिहायचं हा मोठा प्रश्न होता. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अव्वल पाच गीतकारांपैकी मजरूह एक होते. पण ते गीतकार जास्त आणि कवी त्यामानाने कमी होते. उमेदीच्या काळात त्यांनी खरोखरच प्रचंड प्रमाणात उर्दु काव्यलेखन केलं होतं. पण त्यांचं शिक्षण हे सर्वसामान्य शाळा/कॉलेजात न होता मदरशांमध्ये झाल्याने अव्वल उर्दु मधील हे काव्य सर्वसामान्य रसिकांच्या आवाक्याबाहेरचं होतं. हिंदी गीतलेखनाकडे ते केवळ आणि केवळ पोटासाठी वळले. तसा काही काळ त्यांनी हकीम म्हणूनही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. वर उधृत केलेली गझल ही त्यांच्या बेकारीच्या काळातली. जी नंतर मदन मोहन या जादूगाराने वापरून तिचं सोनं केलं. चित्रपटसृष्टीत येण्याच्या आधीची गझल असल्याने "मजरूह" या तखल्लूस चा वापर त्यात आहे. मजरूह चा ढोबळ अर्थ "जख़मी आत्मा".
मजरूह यांचा चित्रपटप्रवास सुरु झाला तो सैगल यांनी गायलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय (अजुनही) ठरलेल्या शहाजहान चित्रपटातील "गम़ दियें मुष्तकिल, कितना नाजूक है दिल ये ना जाना" या गाण्यापासून. या चित्रपटातली सैगलनी गायलेली सगळीच गाणी लोकप्रिय ठरली. त्यातली "गम़ दिये..." आणि "जब दिलही टूट गया" ही तुफान लोकप्रिय ठरली. तरी देखील मजरूह पुढील दोन वर्षे बेकार होते. खाण्या-पिण्याचे वांधे असलेल्या या काळात राज कपूर, नौशाद, मेहबूब खान या आणि अशाच काही मित्रांनी त्यांना आधार दिला. राज कपूरने त्यांचे "ईक दिन बिक जायेगा, माटी के मोल" हे गाणे माती-मोलाने नव्हे तर त्या काळातले चांगले १००० रुपये देऊन विकत घेतलं होतं. नंतर १९४९ मध्ये आलेल्या "अंदाज" ने त्यांचं जिवनच बदलून टाकलं. नौशाद यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाने उत्पन्नाचे नवे-नवे विक्रम केले. पण दुर्दैव परत एकदा आड आलं. हातात असलेले काही चित्रपट पुरेच होऊ शकले नाहीत. त्यातच साहीर, प्रदिप, भरत व्यास आणि शैलेंद्र यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेपुढे मजरूह यांचे अव्वल उर्दू काव्य झाकोळलं गेलं. पैकी साहीर आणि शैलेंद्र यांचं हिंदी बरोबरच उर्दूवरही तितकचं प्रभुत्व होतं. अशीच तब्बल तीन वर्षे गेली. आणि १९५३ मधे आला "फुटपाथ" - संगीत परत एकदा नौशाद. या ही चित्रपटातली सगळीच गाणी (शाम-ए-गम़ की कसम, सो जा मेरे प्यारे, सुहाना है ये मौसम) लोकप्रिय झाली. उर्दूबरोबरच हिंदी काव्यलेखनाचा मजरूह यांचा हा प्रयत्न लोकांना आवडला. आणि गीतकार म्हणून मजरूह यांनी जी सुरूवात केली ती अखेरच्या श्वासापर्यंत ते सातत्याने गीतलेखन करत होते. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९९१ हिंदी चित्रपटगीते मजरूह यांनी लिहीली. गीतसंख्येच्या बाबतीत फक्त आनंद बक्षी (१२५१ गीते) मजरूह यांच्यापुढे आहेत. तरीदेखील मी सुरूवातीस उल्लेख केल्याप्रमाणे साहीर, शैलेंद्र प्रभुतींप्रमाणे केवळ गाण्याच्या बोलांसाठी लक्षात रहातील अशी गाणी त्यांनी फार कमी लिहीली. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. पण त्यामागे संगीताचा वाटा मोठा होता. जवळजवळ सर्वच संगीतकारांबरोबर मजरूह यांनी काम केले. पण केवळ "दोस्ती" चित्रपटातील "चाहुंगा मै तुझे, सांजसवेरें" या एकाच गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. संगीतकाराने आधीच तयार केलेल्या चालींवर गीतलेखन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची आणखी काही लोकप्रिय गाणी खालीलप्रमाणे -
  • सुन सुन सुन सुन जाली़मा - आरपार
  • बाबूजी धिरें चलना - आरपार
  • उधर तुम हसीं हो - मिस्टर अँड मिसेस ५५
  • चलीं गोरी पी के मिलन को - एक ही रास्ता
  • नज़र लागी राजा तोरे बंगले पे - काला पानी
  • तुम जो हुए मेरे हमसफर - १२ ओ क्लॉक
  • कोई आया धड़कन कहती है - लाजवंती
  • रातभर का है मेहमां अंधेरा - सोने की चिडीयाँ
  • यें रातें यें मौसम - दिल्ली का ठग
  • न तुम हमें जानो - बात एक रात की
  • जाग़ दिल-ए-दिवाना - ऊंचे लोग
  • उसको नहीं देखा हमने कभी - दादी माँ
  • आजा पिया, तोहे प्यार दूं - बहारोंके सपने
  • तेरे नैना तलाश करें - तलाश
  • आयों कहां से घनशाम - बुढा मिल गया
याशिवाय सी.आय्.डी., तुमसां नहीं देखा, पेईंग गेस्ट, सुजाता, चलती का नाम गाडी, चायना टाऊन, फिर वोही दिल लाया हुं, दोस्ती, मेरे सनम, तिसरी मंझील, ज्वेल थिफ, दस्तक, कारवाँ, अभिमान - हे असे काही चित्रपट आहेत ज्यातली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय झाली. एखाद्या गीतकाराची एका चित्रपटातली सर्व गाणी लोकप्रिय होण्याच्या बाबतीतला हा रेकॉर्ड आहे जो आजपर्यंत अबाधित आहे.

अशा या महान गीतकाराचा २४ मे रोजी १२ वा स्मृतीदिन होता. त्यानिमीत्त मजरूहजींना केलेला मानाचा मुजरा !
*****************************************************


(मायबोलीवरून पुनःप्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा