बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

मन्ना डे - नाबाद ९३ !


(दि. ०२ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

प्रबोधचंद्र डे उर्फ मन्ना डे यांनी काल वयाची ९३ वर्षे पुर्ण केली. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना !
सगळं काही असून एका अर्थाने उपेक्षित असा हा महान कलाकार ! मन्नादांनी स्वतः ही बोच वारंवार बोलून दाखवली. अर्थात उत्तर आयुष्यात. त्यांच्या काळात अशी खंत करणे, हेवे-दावे करणे, दुसर्‍याचं काम पळवणे वगैरे प्रकार होत नसत. काम मिळवण्याची धडपड त्याही वेळेला होती. पण स्पर्धा ही निकोप असायची. स्वतःची रेषा मोठी दिसावी म्हणून दुसर्‍याची रेषा पुसण्याचे विचार त्यावेळेला कुणी करत नसत. त्याऐवजी मेहनत वाढवून स्वकर्तुत्वाने आपली रेषा कशी वाढेल याकडे त्या कलाकारांचे जास्त लक्ष असायचे. पण काही कलाकारांचे नशिब ही कधी कधी साथ देत नसते. त्यामुळे मुकेश, तलत आणि रफी यांच्या बरोबरीने (कधी कधी या सर्वांच्या वरचढ) काम करूनही मन्नादा कधी नायकाचा आवाज बनू शकले नाहीत. आता असं लक्षात येतय की कितीही नाही म्हटलं तरी भाषावार संगीतकारांचे कॅंप त्याही वेळेला होते. बघा ना, आर्.के. कँप सोडला तर मुकेशचा सर्वात जास्त वापर कल्याणजी आनंदजींनी केला. रफीचा वापर नौशाद आणि ओ.पी. नय्यर यांनी केला. किशोरला तर सुरवातीला फक्त दादा बर्मन यांनीच वापरला. तलत, हेमंतकुमार हे तसे फारसे कँपातले नव्हते. पैकी हेमंतकुमार तर स्वयंभू होते आणि स्वत:च ईतकी सुंदर कंपोझीशन्स करून स्वतःच गात होते. यामुळे मन्नादांना वाली फक्त बंगाली संगीतकार - सचिनदेव बर्मन आणि सलील चौधरी हेच होते. दादा बर्मन तर मन्नादांचे मेंटॉरच होते. चित्रपटातलं पहीलंवहीलं हिट गाणं - उपर गगन विशाल - मन्नादांना दादा बर्मन यांनीच दिलं. मन्नादांच्या नशिबाने ईथंच त्यांना पहिला फटका दिला. त्या काळातल्या हिट नायकांनी स्वतःचे आवाज आधीच ठरवून टाकले होते. उदा. दिलीप कुमार - मुख्यतः रफी आणि तलत. राज कपूर - मुकेश आणि काही प्रमाणात तलत. देव आनंद - हेमंतकुमार, रफी, किशोर. यामुळे मन्नादांचं पहिलं हिट गाणं देखील कुणा नायकाच्या तोंडी नसून बॅकग्राऊंडला होते. पण मन्नादा खचले नाहीत. आपलं नाणं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खणखणीतपणे वाजवतच राहीले. त्यांना लोकप्रियता पण खुप लाभली. पडद्यावर सादर करणारा कलाकार कुणीही असला तरी मन्नादांनी प्रत्येक गाणं हे समरसूनच गायलं. त्याचं फळही नंतरच्या काळात त्यांना मिळ्त राहीलं. पुढे शंकर-जयकिशन यांनी चक्क रफीला डावलून शम्मी कपूरचा आवाज म्हणून त्यांना उजाला मधून पेश केलं. उजालातली सगळी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. राज कपूर साठी आर.के. कँप मधे त्यांनी श्री ४२० मधे आवाज दिला. "दिल का हाल सुने दिलवाला", "मुड मुडके न देख" ही गाणी तुफान लोकप्रिय झाली. आर.के. कँप व्यतीरिक्त केलेल्या राज कपूरच्या "चोरी चोरी", "दिल ही तो है" ई. चित्रपटासाठी मन्नादांनी पार्श्वगायन केले. या सगळ्या काळात त्यांची समांतर ईतर भाषेतही गाणी चालू होती. मराठीमधे "घन घन माला नभी दाटल्या", "अ आ आई, म म मका" या आणि अशा अनेक गाण्यांचं पार्श्वगायन त्यांनी केलं. बंगालीमधे तर दादा बर्मन, सलील चौधरी आणि रविंद्र संगीत गायन त्यांनी केलं. मल्याळम भाषेतल्या "चेम्मीन" या सलील चौधरी यांनी संगितबद्ध केलेल्या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण हे सगळं असूनही कुठेतरी काहीतरी राहून जात होतं. मन्नादांचं नाव फक्त शास्त्रीय संगितावर आधारित गाणी गाणारा गायक म्हणूनच प्रसिद्ध होतं. रफी करू शकत असलेल्या सगळ्या गोष्टी गळ्यातून उतरवण्याची तयारी असलेल्या मन्नादांना मात्र बहुतेक वेळेला सहनायक असलेल्या व गाणं असलंच पाहीजे ही अट असलेल्या मेहमूद साठी गाणं भाग पडलं. याचा वाईट परिणाम ईतकाच झाला की पडद्यावर मेहमूद असल्याने मन्नादांनी जिव ओतून गायलेल्या (मुख्यत: शास्त्रीय संगीतावर आधारीत) काही गाण्यांकडे लोकांनी गंभिरपणे लक्षच दिलं नाही. अर्थात त्यामुळे मन्नादांनी आपल्या पुढच्या गाण्यामधे याचा परिणाम होऊ दिला नाही हे त्यांचं मोठेपण. उदा. काही गाणी - जिद्दीमधले "प्यार की आग में", पडोसन मधली "सावरीया आणि एक चतूर नार", भूतबंगला मधील "आओ ट्विस्ट करें" ई. याव्यतिरिक्तही काही गाणी मला आठवतात - दुज का चांद मधलं "फुलगेंदवा न मारो" हे गाणं नुसतं ऐकलं की त्यातल्या हरकती किती कठिण आहेत हे लक्षात येतं पण पडद्यावर आगाने ते सादर केल्यामुळे गाणं बघताना हसण्याच्या नादात मन्नादांची कामगिरी दुर्लक्षली जाते. तिच गोष्ट दिल ही तो है मधल्या "लागा चुनरी में दाग" गाण्याची. पडद्यावर ते विनोदी पद्धतीने सादर केले गेले आहे. मेरे हुजूर मधले "झनक झनक तोरी बाजे पायलीया" पडद्यावर जरी विनोदी पद्धतीने सादर केले नसले तरी त्या गाण्यावर राजकुमारला बघून विनोद निर्मीती आपोआपच होते. देख कबिरा रोया मधलं "कौन आया मेरे मनके व्दारे" हे गाणं अनुपकुमारच्या तोंडी आहे जो केवळ किशोरकुमारचा भाऊ असल्याने विनोदी कलाकार समजला गेला. बात एक रात की मधे जॉनी वॉकरच्या तोंडी असलेली दोन अप्रतिम गाणी - पैकी एक "किसने चिलमनसें मारा" आणि दुसरे ओठावर आहे पण लक्षात येत नाहीये - ही अशीच वाया गेली.
आता दोन किस्से - पहीला प्रसिद्ध किस्सा आहे बसंत बहार चित्रपटातील "केतकी गुलाब जुही" या जुगलबंदीचा. तो मन्नादांच्या तोंडून ऐकताना आणखी मजा येते. संगितकार जयकिशनच्या असीस्टंट ने मन्नादांना फोन करून सांगीतले की मुख्यतः बसंत या रागावर आधारित एक जुगलबंदी आहे तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता फेमस स्टुडीओमधे या. मन्नादा म्हणतात की दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून थोडाबहूत रियाज करून मी स्टुडीओत पोचलो. आता चित्रपटातली जुगलबंदी म्हणजे समोर बहूतेक करून रफीच असणार. मजा येईल जरा गायला. स्टुडीओत पोचलो पण रफी काही दिसेना. सगळीकडे शोधलं. तर म्युझीकरूम मधे पं. भिमसेनजी जोशी बसलेले दिसले. वाटलं आले असतील एखाद्या शास्त्रिय गायनाच्या रेकॉर्डींगला. इतक्यात समोर शंकर दिसले. मला म्हणाले चला, चला ! आपण म्युझीकरूम मधे जाऊ ! मी तुम्हाला चाल समजाऊन देतो ! मी म्हटलं, शंकरजी, ते ठिक आहे. पण दुसरा गायक कोण आहे ? रफीच आहे ना ? तो तर आलेला दिसत नाही ! ते म्हणाले, नाही ! रफी नाही ! पं. भिमसेनजी जोशींबरोबर तुम्हाला ही जुगलबंदी गायची आहे ! मी अक्षरशः तिन-ताड उडालो. हे मला अपेक्षितच नव्हतं. माझ्या तयारीचा प्रश्न नव्हता. पण तरीही पं. भिमसेनजी जोशी ? मग मी काय केलं ? अक्षरशः पळालो ! दोन दिवस मुंबई सोडून गेलो. पण शेवटी पं. भिमसेनजी जोशीजींनी स्वतःच मला समजावलं. चित्रपटसंगितात हे चालायचंच. पण त्यातही मी नायकाचा आवाज - म्हणजे ती जुगलबंदी मी जिंकतो असं दाखवायचं होतं ! आणि हे मला मान्य नव्हतं ! पण शेवटी एकदाचा सुवर्णमध्य निघाला आणि ते गाणं रेकॉर्ड झालं !
दुसरा किस्सा आहे - "मेरी सुरत तेरी आँखे" या चित्रपटावेळचा. काही कारणाने माझ्या गळ्याला संसर्ग झाला होता आणि आवाज निट काम करत नव्हता. त्या चित्रपटातली बाकीची गाणी झाली होती. पण एक मुख्य गाणं - अहिरभैरव या रागावर आधारीत - पुछो ना कैसे मैने रैन बितायी - हे रेकॉर्ड होण्याचे बाकी होते. या गाण्यासाठी संगितकार दादा बर्मन यांना माझाच आवाज वापरायचा होता. आणि माझा गळा काही ठिक होत नव्हता. दिवस वाया जात होते. मी माझी असमर्थता दादांना सांगून पाहीली आणि वेगळा गायक घेण्याचे सुचवले. पण तेही हटूनच बसले होते. शेवटी हो-नाही करत एके दिवशी रेकॉर्डींग ठरले. फायनल टेकच्या वेळेला पहीलं कडवं व्यवस्थित झाल्यावर एके ठिकाणी माझा आवाज तुटला (चिरकला). त्या वेळेला आजच्या सारखं ट्रॅक रेकॉर्डींगची सोय नव्हती. चुकलं की पुर्ण गाणं परत रेकॉर्ड करावं लागे. मी दादांकडे बघीतलं. त्यांनी नजरेनेच मला "चालू राहू दे" असा ईशारा केला. रेकॉर्डींग झालं. मी हळूच दादांना विचारलं - म्ह्टलं दादा ! एका ठिकाणी माझा आवाज फाटलाय ! आपण पुन्हा रेकॉर्ड करू या का ? ते म्हणाले - नको ! उलट मला या जागी हेच अपेक्षित होतं ! याचं कारण चित्रपटात हे दृष्य अशा वेळेला आहे की नायक अतिशय हताश मनःस्थितीत आहे. तो शास्त्रीय गायक आहे. पण या वेळेला अतिशय उदास आहे, जगण्याला कंटाळलेला आहे. अशा परिस्थितीत अगदी परफेक्ट गाणे अपेक्षित नाही. उलट मी सांगूनही कदाचित नेहमीच्या वेळेला तुला हा ईफेक्ट देता आला नसता जो तुझ्या या फाटलेल्या आवाजाने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा