सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

काव्यावळ

आंतरजालावरील  तमाम नव-कवी/कवयित्री, अमका-ग्रज, तमका-ग्रज, अमका-सूत, तमके-भूत ई.ई. सर्वांसाठी खुषखबर !

"सहनही होत नाही आणि लिहीताही येत नाही" - कारण अपूरे शब्दसंग्रह, कल्पना-दारिद्र्य ! काय आपण अशा दुखण्याने बेजार आहात. मग आपली वेदना आता आमच्यावर सोपवा आणि आपण बिनघोर झोपा. कारण "मागणी तसा पुरवठा" या तत्त्वावर आधारित "काव्यावळ" आता सुरु झाली आहे. या काव्यावळीची वैशिष्ट्ये, नियम आणि अटी खालीलप्रमाणे :
  • 'विषय' वगळता कुठल्याही विषयावर काव्य लिखाणाची हमी

  • कुठल्याही एका विषयावर एका तिमाहीत फक्त पाच कविता (त्यामुळे एकसुरी पणा टाळून योग्य संदेश पोचतो)

  • आपण निवडलेला विषय कशा प्रकारे सादर व्हावा याची ग्राहकाला पुर्ण मुभा ! उदा. गंभिर, विनोदी, पाचकळ, आर्त ई. ई.

  • एकदा निवडलेला विषय ऑर्डर नोंदवल्यानंतर बारा तासाच्या आत बदलण्याची सुविधा

  • आपल्या कवितेत आपला आवडता/आवडते शब्द वापराची सशुल्क सुविधा. (शब्दाप्रमाणे शुल्क आकारले जाईल)

  • कवितेचा मेहनताना आम्ही एकदाच आणि तोही ऑर्डर नोंदवण्यावेळी अ‍ॅडव्हान्स स्विकारतो.
अटी :
  • ग्राहक आणि विक्रेता (म्हणजे आम्ही) यांतील व्यवहार जरी पुर्णपणे अ-पारदर्शक असला तरी सदर व्यवहाराच्या गोपनियतेची हमी विक्रेता घेणार नाही. तशी हमी हवी असल्यास सशुल्क देण्यात येईल. उदा. एकदा आपले नाव आमच्या ग्राहकयादीत समाविष्ट झाल्यानंतर जर कधी आपणांस स्वतः काही लिहीण्याची आणि ते माबो वर प्रकाशित करण्याची (दुर्)बुद्धी झाली तर "सदरचे साहित्य आमच्या काव्यावळीतुनच विकत घेतले आहे" अशी टवाळी होऊ शकते.

  • आमच्याकडून विकत घेतलेल्या साहित्यावर "मेड टू ऑर्डर" आणि खाली "कविराज टवाळ" हे शब्द अपरिहार्य आहेत. जर आपणांस ते नको असतील किंवा त्याजागी कवी म्हणून आपले स्वतःचे नाव हवे असेल तर तशीही सुविधा सशुल्क उपलब्ध आहे. या सुविधेमध्ये आपल्या नावावर प्रकाशित झालेल्या कवितेच्या जाहिरातीसाठी पाच आय-ड्यांच्या वि.पू. मध्ये रिक्षा फिरवून आणण्याचे शुल्कही समाविष्ट आहे. तेव्हा या सुविधेचा लाभ जरूर घ्यावा.

  • कोणत्याही कवितेची फक्त तिन(च) कडवी लिहून मिळतील. त्याव्यतिरिक्त प्रत्येक कडव्याचा वेगळा आकार पडेल.

  • सदर "काव्यावळ" ही पुर्णपणे स्वायत्त असून ती कुठल्याही जन, गण आणि मन्-लोकपालाच्या कक्षेत येत नाही.

आणखीही काही सुविधा आणि अटी यांचा मसूदा तयार असून ग्राहकांच्या प्रतिसादाप्रमाणे तो योग्य वेळी जाहीर करण्यात येईल !

ग्राहकांचा संतोष हाच आमचा फायदा !

आपला नम्र,
टवाळ


(मायबोलीवरून पुनःप्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा