मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो


सध्या ऒफीसमधे खरंतर प्रचंड काम आहे. ईतकं की घरी आलो की अक्षरश: थकून पडून जाईन की काय असं वाटतं. तरीही आतून एक प्रकारचं रिकामपण आहे. काय काय संकल्प ठरवले होते पण एकही सुरू झाला नाही. जिवनाचे सुत्र हे कुठल्याही रिळाला गुंडाळले नसून नुसता सुतड्याचा गुंडाळा झाला आहे. मला साहीर पावलो-पावली भेटतो असं मला नेहमी वाटतं. तसाच काहीसा अनुभव आता मला संदीप खरेच्या बाबतीत येतो आहे. कारण माझ्या मनाची ही अवस्था अगदी जशीच्या तशी मला त्याच्या कवितेत सापडली.

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे
उत्तर कुठले, मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी, नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कसल्या दिलखुष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पुर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो

कळून येता जगण्याची या ईवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा