मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

संजीव कुमार

हिंदी चित्रपटातील सार्वकालिक महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या हरीभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार याचा आज (०६.११.२०१२) २७ वा स्मृतीदिन ! त्या निमित्ताने या कमनशिबी अभिनेत्याला माझा मानाचा मुजरा ! कमनशिबी अश्यासाठी की ज्यावेळी तो उमदा, तरूण दिसत होता त्यावेळी दुद्रैवाने कसदार भुमिका त्याच्याकडे तश्या कमी आल्या. आणि त्यानंतर वैयक्तिक जिवनातल्या एकतर्फी प्रेमभंगामुळे त्याने दारुला आपलसं केलं ते शेवटपर्यंत. त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला आणि तो दिवसेंदिवस जास्त बेढब होत गेला. ईतर महान अभिनेत्यांप्रमाणेच त्याने आपली कारकिर्द नाटकांपासून केली होती. आधी "संघर्ष" आणि नंतर "विधाता" मधे तो दिलीपकुमारसमोर तितक्याच ताकदीने उभा राहीला. "देवता" मधली त्याची भुमिका मला विशेष आवडली. तश्या मला त्याच्या बहुतांश भुमिका आवडायच्या. पण "अंगूर","मौसम","कोशीश" ई. त्याचे खास लक्षात रहाणारे चित्रपट. विशेष म्हणजे त्याच्या समकालीन तगड्या आणि दिसायला सुंदर असलेल्या काही नटांना यशासाठी ईतर नायकांबरोबरच्या चित्रपटांवर अवलंबून रहावं लागत असताना - रुढार्थाने हिरोला साजेशी पर्सनॆलीटी नसतानाही - संजीव कुमारने एकमेव नायक म्हणून चित्रपट केले आणि ते यशस्वीही ठरले. "नया दिन नयी रात" मधे त्याने कमालच केली होती. पण "दस्तक", "मनचली","अनामिका", "आंधी", "उलझन", "अनोखी रात" हे देखील त्याच्या अभिनयाकरता लक्षात रहातात. चरित्र भुमिका हा एक वेगळा विषय होईल. नायकाच्या बरोबरीने त्याने चरित्र भुमिकाही वठवल्या. त्याविषयी नंतर कधीतरी किंवा विशाल / मंदार त्यात भर घालतीलच.

"चंदा और सुरज" या पोषाखी चित्रपटातील रफीने गायलेलं आणि संजीव कुमारवर चित्रीत झालेलं "तेरे नाम का दिवाना, तेरे घर को ढुंढता है" हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. तेच शेअर करून मी या महान अभिनेत्याला आदरांजली वाहतो.

http://youtu.be/uGQtX3ZditA


बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

सचिन देव बर्मन


"म हा न" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव उर्फ एस.डी. उर्फ "दादा" बर्मन यांचा आज ३७ वा स्मृतीदिन !

दादा बर्मन सर्वार्थाने दादाच होते. केवळ १०० हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण मेलडी, ऒर्केस्ट्रेशन, चाली, शब्दांची आणि गायकांची अचूक निवड या गोष्टींमुळे भारंभार संगीत देणार्या ईतर संगीतकारांपेक्षा ते खुप वेगळे होते. मणीपूरच्या राजघराण्यातले असल्याने वागण्या-बोलण्यात एक प्रकारची हुकुमत आणि रुबाब होता. सर्व जिनीयस लोकांचा असतो तसा एक प्रकारचा उर्मट, आढ्यताखोर आणि विक्षीप्तपणाही त्यांच्या वागण्यात होता. पण या सर्व अवगुणांवर त्यांच्या संगीतातल्या विविधतेने मात केली. आणि रसीकांना कायम मोहात पाडेल असे संगीत त्यांनी दिलं. एकाच चित्रपटात नायक/नायीकांसाठी त्यांनी बिनदिक्कत पणे वेगवेगळ्या गायकांचा वापर केला आणि तो यसस्वी ही करून दाखवला. त्यांच्या चित्रपटातला देव आनंद एकाच चित्रपटामधे कधी किशोरच्या तर कधी रफी, हेमंतकुमार, तलत यांच्या आवाजात गायचा आणि विशेष म्हणजे त्या त्या ठिकाणी तोच आवाज योग्य वाटायचा. गायकांप्रमाणे त्यांच्या गाण्यातल्या वाद्यांची निवडही अचूक असायची. स्वत: गायक असले तरी आपला आवाज त्यांनी कधीही कुठल्या नायकाला किंवा सहकलाकाराला दिला नाही. त्यांनी गायलेली गाणी ही कायम पार्श्वभुमीवर वाजायची आणि त्या त्या चित्रपटातल्या कथेचा एक हिस्सा बनायची. उदा. "गाईड" मधले "वहॊं कौन है तेरा, मुसाफीर जायेगा कहॊं" असो किंवा "सुजाता" मधलं "सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा" असो, ही गाणी म्हणजे त्या चित्रपटाच्या कथेचाच एक भाग होती.

बर्मनदांची आणखी एक देणगी म्हणजे "देवाचं सर्वात लाडकं बाळ" असलेल्या किशोर कुमारच्या आवाजाचा त्यांनी केलेला वापर. "आराधना" मुळे किशोर जरी गायक म्हणून घोडदौड करू लागला असला तरी या आराधनापुर्वी किशोरच्या आवाजातली अनेक अजरामर गीते ही बर्मनदांनीच दिली आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं काही काळ लता आणि नंतर रफीशी पटत नव्हतं. पण किशोरच्या बाबतीत ही गोष्ट कधीच घडली नाही. एखाद्या गायकाने गायलेले गाणे जर त्यांच्या मर्जीस आले नाही तर ते उघडपणे चारचौघात त्या गायकाला ही गोष्ट सुनवीत असत. "सुजाता" मधलंच तलतचं "जलते है जिसके लिए" हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे. अनेक रिर्हसल करूनही शेवटपर्य़ंत तलतला हे गाणं जसं बर्मनदांना अभिप्रेत होतं तसं गाता आलं नव्हतं. शेवटी दिग्दर्शक बिमल रॊय यांनी रदबदली करून हा वाद मिटवला. विशेष म्हणजे संगीतकाराला शेवटपर्यंत न रुचलेलं हे गाणं तलतच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमधलं एक आहे.

किशोरप्रमाणेच (आराधना) मन्ना डे च्या उत्कर्षाला देखील बर्मनदाच जबाबदार आहेत. आधी काही पौराणीक चित्रपटांची गाणी गाऊन आणि अपयशी ठरून कलकत्त्याला परत जाण्याच्या विचारात असलेल्या मन्नादांना त्यांचं पहिलं लोकप्रिय गीत - उपर गगन विशाल - हे बर्मनदांनीच दिलं. या गाण्याचं वैशीष्ट्य म्हणजे हे गाणं आधी बर्मनदांच्या आवाजात रेकॊर्ड होऊन त्याचं चित्रीकरणही झालं होतं. पण त्याच सुमाराला बर्मनदांचं निर्माता अशोक कुमारशी (चित्रपट - मशाल) बिनसलं. पण व्यावसायिक करारामुळे बर्मनदांनी चित्रपटाला संगीत तर दिलं पण आपला आवाज वापरायला नकार दिला आणि हे गाणं मन्नादां कडे आलं.

शंकर-जयकिशनचा प्रचारक असलेला माझा मित्र बाकी सर्व संगीतकारांची उणी-दुणी काढायचा, त्यांच्या त्रुटी दाखवायचा पण बर्मनदांचा विषय काढला की फक्त "दादा बर्मन - मोठा माणूस" एवढंच बोलून कानाच्या पाळ्यांना हात लावायचा.

बर्मनदांचा विषय काढला की "ज्वेल थिफ" मधलं "होठोंमे ऐसी बात" हे गाणं माझ्या मनात आधी येतं. भारतात वापरल्या जाणार्या जवळपास सर्वच तालवाद्यांचा वापर या गाण्यात आहे. हे गाणं ऐकताना मला नेह्मी एकच विचार मनात येतो की एवढ्या सगळ्या वाद्यांचा वापर करताना या रचनेचा आकृतीबंध (व्हिज्युअलायजेशन) त्यांच्या डोक्यात कसा आला असेल. जेव्हा मेलडी बनवली जाते किंवा स्वरवाद्यांचा वापर गाण्यांमधे केला जातो तेव्हा प्रत्येक वादकाला त्याची त्याची नोटेशन्स दिलेली असतात. तालवाद्यांमधेही हे करता येतं पण हे काम खरंच जिकीरीचं आहे. कारण टायमींग हा त्यातला सर्वात महत्वाचा हिस्सा आहे. एखाद्या ठेक्याच्या बाबतीत हे करणं शक्य आहे पण एकाच गाण्यामधे वापरलेल्या किमान पंधरा वेगवेगळ्या जातकुळीच्या तालवाद्यांबाबत हे करण्यासाठी, त्याचा विचार करण्यासाठी जिनीयसचं हवा.

बर्मनदांच्या याच गाण्याला (होठोंमे ऐसी बात मै दबाके चली आयी - ज्वेलथिफ) शेअर करून मी या सार्वकालिक महान संगीतकाराला आदरांजली वाहतो !


http://www.youtube.com/watch?v=jtn4am42kW4

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो


सध्या ऒफीसमधे खरंतर प्रचंड काम आहे. ईतकं की घरी आलो की अक्षरश: थकून पडून जाईन की काय असं वाटतं. तरीही आतून एक प्रकारचं रिकामपण आहे. काय काय संकल्प ठरवले होते पण एकही सुरू झाला नाही. जिवनाचे सुत्र हे कुठल्याही रिळाला गुंडाळले नसून नुसता सुतड्याचा गुंडाळा झाला आहे. मला साहीर पावलो-पावली भेटतो असं मला नेहमी वाटतं. तसाच काहीसा अनुभव आता मला संदीप खरेच्या बाबतीत येतो आहे. कारण माझ्या मनाची ही अवस्था अगदी जशीच्या तशी मला त्याच्या कवितेत सापडली.

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठलाही अन ताप नको आहे
उत्तर कुठले, मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी, नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भिती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कसल्या दिलखुष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पुर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो

कळून येता जगण्याची या ईवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो