बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

ऐ मेरे प्यारे वतन - प्रेम धवन


साल १९६१ - निर्माता बिमल रॉय यांचा "काबूलीवाला" प्रदर्शित झाला. रविंद्रनाथ ठाकूरांची (टागोरांची) मुळ जबरदस्त कथा, तिला विश्राम बेडेकरांनी चढवलेला पटकथेचा साज, बलराज सहानी-उषा किरण आणि बेबी फरीदा (जलाल) यांचा अप्रतिम अभिनय आणि या सर्वांवर कळस म्हणून की काय सलील चौधरी यांचे संगीत. असा सगळा सोहळा जमून आल्यानंतर प्रेक्षक भारावतील नाही तर काय ? पण एवढं सगळं असूनही या चित्रपटाचा खरा आत्मा ठरलं मन्ना डे यांनी गायलेलं एक गीत -
माँ का दिल बनके कभी, सिने से लग जाता है तु
और कभी़ नन्हीसीं बेटी, बनके याद आता है तु
जितना याद आता है मुझको, उतना तडपाता है तु
तुझपें दिल कुर्बान
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछडे चमन
तुझपें दिल कुर्बान
आज या गीताच्या जन्माला ५० वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. तरी देखील जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यातून पाणी येतंच. आम्ही आमच्या देशात राहूनही जर हे होतयं, तर वर्षानूवर्षे भारताबाहेर रहाणार्‍यांचे काय होत असेल ! मन्ना डे यांचा आर्त स्वर, त्याला फक्त एका मेंडोलीनची आणि थोड्याशा र्‍हिदमची साथ आणि या गाण्याचे बोल. सगळं एक अजब रसायन आहे. जे फक्त अश्रुधुर पसरवतं ! स्मित वास्तविक या चित्रपटातली बाकीची सर्व गाणी जी गुलजा़र यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरली आहेत, तीही तितकीच ताकदीची आणि लोकप्रिय आहेत. पण या गाण्याची बातच और आहे.
साल १९६५ - निर्माता केवल कश्यप यांचे नाव पुढे करून मनोज कुमारने चित्रपट निर्मीती मधे उतरायचे ठरवले. मनोज कुमारला या देशातल्या लोकांची मानसिकता अचुक पणे माहीती होती. त्यामुळे त्याने सरळ देशभक्तीपर चित्रपट बनवण्याचे योजले. कथा निवडली शहीद भगतसिंग यांची. रामप्रसाद बिस्मील यांच्या काही मुळ रचना त्याने चित्रपटात वापरायच्या ठरवल्या. बाकी गाण्यांचा प्रश्न होता. गीतकार पी.एल.संतोषी (राजकुमार संतोषी यांचे वडील) हे मनोजकुमारचे खास मित्र. त्यांनीच मनोज कुमारला प्रेम धवन यांचे नाव सुचवले. चित्रपट प्रदर्शित झाला. मोहम्मद रफी यांच्या आवाजातले रामप्रसाद बिस्मील यांचे "सरफरोशी की तमन्ना" लोकप्रिय झालेच. पण त्याहून लोकप्रिय झाले - "ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम" आणि क्लायमॅक्सला असलेले "मेरा रंग दे बसंती चोला". या चित्रपटाचे संगीतही प्रेम धवन यांचेच होते.
साल १९६६ - फेब्रुवारी महीना - चर्चगेट स्टेशनच्या बाहेर त्याही वेळी चाकरमान्यांचे लोंढे सकाळच्या वेळात असायचेच. या गर्दीमध्ये एक भिकारी हार्मोनियम घेऊन जमेल त्या सुरात गात होता. अचानक गर्दीमधून एक रेघा-रेघांचा बुशकोट घातलेला किंचीत स्थुल बांध्याचा ईसम पुढे आला. त्याने त्या भिकार्‍याची आस्थेने चौकशी केली. थोड्या वेळाने त्याने त्या भिकार्‍या कडून हार्मोनियम मागून घेतली. आणि गायला सुरवात केली - "गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे, वो दस लाख देगा". त्याच्या दैवी आवाजाची जादू लगेच झाली. भिकार्‍याच्या थाळीत त्या दिवशी पैशाचा वर्षाव झाला. त्यात आपलीही थोडी भर घालून तो ईसम जसा आला तसाच निघून ही गेला. हा किस्सा खरा असावा. कारण तो भिकारी म्हणजे स्टंटपटांच्या जमान्यातला एक लोकप्रिय हिरो होता आणि तो दयाळू गायक होता - मोहम्मद रफी. त्याच सुमारास प्रदर्शित झालेल्या दस लाख या चित्रपटातले तोपर्यंत लोकप्रिय झालेले हे गाणे गाऊन त्या जुन्या सहकार्‍याला मदत मिळवून देणे हे फक्त रफींनाच सुचू शकते. हा किस्सा खरा असु शकण्याचे आणखी एक कारण, मी तो रसरंग या सिने-पाक्षिकामधे श्री. ईसाकजी मुजावर यांच्या लेखात वाचला आहे. ईथे हा किस्सा केवळ एवढ्यासाठी नमूद करावासा वाटला कारण या गीताचे गीतकारही प्रेम धवन हेच होते. थोडे विषयांतर होईल, पण आम्ही मित्र संगीतकार रवी यांना भिकार्‍यांचे मसिहा म्हणायचो. कारण भिकार्‍यांना उपयोगी पडू शकतील अशी एक नव्हे तीन तीन गाणी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात बनली. "गरीबोंकी सुनो, वो तुम्हारी सुनेगा" - दस लाख, "औलाद वालों फुलों फलों" - एक फुल दो माली आणि "तुझको रख्खे राम, तुझको अल्ला रख्खे" - आँखे. पैकी पहील्या दोन गाण्यांचे गीतकार प्रेम धवन हेच होते हे आणखी विशेष.
१९४८ साली आलेल्या बाँबे टॉकीजच्या "जिद्दी" या चित्रपटाने हिंदी चित्रपटसॄष्टीला ३ नवे कलाकार मिळवून दिले. एक म्हणजे, देव आनंद यांना नायक म्हणून लाभलेलं पहीलंच व्यावसायिक यश त्यामुळे देव आनंद यांची कारकिर्द खर्‍या अर्थाने सुरू झाली. दुसरे म्हणजे प्रेम धवन यांना गीतकार म्हणून पहीला मोठा ब्रेक आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या सर्वात लाडक्या बाळांपैकी एक असलेला किशोर कुमार नावाचा गायक, नायक, संगीतकार आणि बरंच काही. किशोरने गायलेले पहिले गाणे - "मरनेंकी दुवाएं क्युं मांगू, जिने की तमन्ना कौन करे" हे प्रेम धवन यांनीच लिहीलं होतं.
देशभक्तीपर गाणी लिहीताना प्रेम धवन यांच्या प्रतिभेस विशेष बहर येई. "छोडो कलकी बातें, कल की बात पुरानी" हे हम हिंदूस्थानी या चित्रपटातील गीत त्याचे आणखी एक उदाहरण. याचे कारण त्यांच्या बालपणात दडलेले आहे. प्रेम धवन यांचे वडील ब्रिटीश सरकारच्या नोकरी मधे जेल सुपरिंटेंडेंट होते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बदल्यांमुळे प्रेम धवन यांनी लहानपणीच तुरूंगात असलेल्या स्वातंत्र्यसैनीकांचे ब्रिटीशांनी केलेले हाल पाहीले होते. पुढे मोठेपणी त्यांनी ला॑होरच्या कॉलेजमधे प्रवेश घेतला जिथे त्यांचे वर्गमित्र होते - साहीर लुधीयानवी. साहीरच्या बरोबरीने प्रेम धवन यांनीही वेगवेगळ्या चळवळींमध्ये भाग घेतला. अनेक देशभक्तीपर कविता त्या दोघांनी लिहील्या. ते दोघेही बरोबरीने कम्युनिस्ट पार्टीमधे सामील झाले. पुढे मुंबईला आल्यावर त्यांनी "ईप्टा" मधे प्रवेश केला. ईथे त्यांनी वेगवेगळी नाटके, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीला हातभार लावला. काही काळ ते पं. रवीशंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीतही शिकले. याचाच फायदा त्यांना पुढे "शहीद" आणि ईतर काही चित्रपटांना संगीत देताना झाला. पं. रवीशंकर यांचे मोठे बंधू उदय शंकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचेही धडे घेतले.
पण एवढे सगळे गुण असूनही, दर्जेदार काव्य रचूनही त्यांचे समकालीन गीतकार/कवी शैलेंद्र, साहीर आणि हसरत जयपूरी यांच्याप्रमाणे स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यात ते अपयशी ठरले. हा एक प्रकारे त्यांच्या प्रतिभेवर झालेला अन्यायच म्हणावा लागेल. आणि रसिकांचं दुर्दैव. संगीतकारांमधे खेमचंद प्रकाश (यांनी त्यांना पहीली संधी दिली), अनिल विश्वास, सलील चौधरी, चित्रगुप्त आणि रवी यांच्याशी त्यांचे विशेष जमायचे. त्यातही सर्वात जास्त (लोकप्रिय) गीते त्यांनी रवी यांच्या संगीतामधे दिली.
काव्याबरोबरच नृत्याचीही त्यांना विशेष आवड होती. काही चित्रपटगीतांचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले. त्यात विशेष उल्लेख म्हणून नया दौर चित्रपटातील "उडें जब जब जुल्फे तेरी" चा उल्लेख करावा लागेल. या व्यतीरिक्त दो बिघा जमिन, धूल का फूल, गुंज उठी शहनाई, वक्त या आणि अशाच काही चित्रपटांचे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले.
त्यांची काही गाजलेली गाणी खालीलप्रमाणे -
१. ऐ मेरे प्यारे वतन - काबूलीवाला (मन्ना डे यांच्या सर्वोत्तम पाच गाण्यांपैकी) *
२. सिनें में सुलगते है अरमान - संगदिल
३. मुझे प्यार की जिंदगी देने वाले - जबक
४. तेरी दुनियासें दूर, चले होके मजबूर - जबक
५. तेरी दुनियांसें, होके मजबूर चला - पवित्र पापी
६. वफा़ जिनसें की, बेवफा़ हो गये -
७. छोडो कलकी बातें - हम हिंदूस्थानी
८. ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम - शहिद
९. मेरा रंग दे बसंती चोला - शहिद (चित्रपटातले गीत प्रेम धवन यांनी लिहीले आहे. मुळ गीत वेगळे आहे)
१०. एवें दुनीया, देवे दुहाई (तेकी मै झूठ बोलीयां) - जागते रहो *
११. तुझें सुरज कहूं या चंदा - एक फुल दो माली
१२. ओ नन्हेसें फरीश्तें - एक फुल दो माली
* - ही दोन्ही गाणी त्या त्या चित्रपटातली प्रेम धवन यांची एकमेव गाणी आहेत. काबूलीवाला ची बाकी गाणी गुलजार यांची तर जागते रहो मधली शैलेंद्र यांची.
असा हा हरहुन्नरी कवी /गीतकार आणि संगीतकार. दि. ७ मे रोजी त्यांचा ११ वा स्मृतीदिन होता. दुर्दैवाने ईतर लेखांच्या गडबडीमधे नजरचूकीने या कलाकाराला योग्य वेळी मानवंदना द्यायची राहून गेली. आयुष्यभर ईतर प्रतिभावान कवींच्या सावलीमुळे थोडासा उपेक्षितच राहीलेल्या या कलाकाराची माझ्यासारख्या किंचीत चित्रपटवेड्याकडूनही चित्रपटांच्या या शतकोत्सवी वर्षात अशी उपेक्षा व्हावी याला काय म्हणावं ? अरेरे
सलाम प्रेम धवनजी ! त्रिवार सलाम !
*****************************************************
(दिनांक ११ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा