बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

हँसता हुआ नुरानी चेहरा - लक्ष्मीकांत


सन १९७२-७३ ची गोष्ट. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमधे "वचन" या चित्रपटाच्या गाण्यांचे (कैसी पडी मार) रेकॉर्डींग चालले होते. फावल्या वेळात संगीतकार शंकर (एस्.जे.) हे एका निवांत जागी पान जमवत बसले होते. भोवती शारदा आणि ईतर गोतावळा होताच. ईतक्यात मशहूर ट्रंपेटवादक पं. रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजींचे वडील) तिथे आले. शंकर-जयकिशन (जयकिशन तोपर्यंत हे जग सोडून गेले होते) हे ईंडस्ट्रीतल्या बर्‍याच जणांचे श्रद्धास्थान. त्यामुळे सहाजिकच शंकरजीना बघून ते थांबले. नमस्कार्-चमत्कार झाले. बोलता-बोलता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विषय निघाला. शंकरजींच्या आजूबाजूचे चमचे (शारदा सकट) अकारण कुचेष्टा करण्यात रमले. अचानक शंकर यांनी प्रश्न केला - "क्यो बाबाजी, बच्चोंका काम कैसे चल रहा है ?" यावर रामप्रसादजींचे उत्तर होते - "क्या बतायें, बस आप लोगोंने (एस्.जे.) पान खा कर थुंका हुवा चाट-चाटके दिन निकाल रहें है"
हा किस्सा शब्दशः सगळ्या संदर्भांसकट खरा आहे. कारण एस-जेंच्या ताफ्यात काम करणारे आणि त्यांना देवाच्या ठिकाणी मानणारे माझे दिवंगत मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि गंमत म्हणजे रामप्रसादजींच्या या उत्तराने केवळ शंकर यांचा अहंकार सुखावला असं नाही, तर तिथे उपस्थित सर्वांना ते पटलं. पण एका वडीलांनी नुकत्याच प्रसिद्धीला येणार्‍या आपल्या मुलाबद्दल ईतका हिणकस शेरा मारावा ईतके लक्ष्मीकांत-प्यारेलाल सुमार दर्जाचे होते का ? नुसत्या आकडेवारीत उत्तर द्यायचं झालं तर केवळ ३५ वर्षाच्या कारकिर्दीत ६३५ चित्रपट - म्हणजे साधारणतः ३५०० च्या वर गाण्यांना संगीत देउन एक-दोन नाही तर तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणे, तेही लौकीकार्थाने कुठलेही संगीत शिक्षण पुर्ण न करता (संगीतच काय, त्यांचे शालेय शिक्षणही पुर्ण नव्हते) - हे काय सुमार दर्जाचे लक्षण आहे ? पण काही काही माणसांच्या कपाळावर जन्मतःच नियतीने नावडतेपणाचा शिक्का मारलेला असतो. नाहीतर बघा ना, एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, शंकर-जयकिशन या संगीतकारांची नावे जरी घेतली तरी ऊर भरून येणारी माणसे होती आणि आहेतही. पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बाबतीत हे कधीच झाले नाही.
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - मुंबईच्या झोपडपट्टीत खाण्या-पिण्याची भ्रांत असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील लहानपणीच निवर्तल्याने लवकरच त्यांना पोटा-पाण्यासाठी काम करणे भाग पडले. अशातच कधीतरी ते मेंडोलीन वाजवायला शिकले. खरंतर मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तरीही केवळ मेहनतीने आणि अंगभुत हुशारीने ते लवकरच त्यात पारंगत झाले. अशाच एका कार्यक्रमात लहानपणीच त्यांनी लता दिदींना साथ केली. त्यावेळी या छोट्या मुलाची कर्तबगारी आणि वादनातील कौशल्य याने लता दिदी भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले. लता दिदी आणि लक्ष्मीकांत यांचा हा स्नेह लक्ष्मीकांतजींच्या मृत्युपर्यत अबाधीत होता. लता दिदींनी लक्ष्मीकांतजींना "सुरील कला केंद्र" या लहान मुलांना संगीतशिक्षण देणार्‍या संस्थेत पाठवले. तिथेच त्यांची भेट प्यारेलालजींशी झाली. वडील मशहूर ट्रंपेटवादक असले तरी का कोण जाणे, त्यांनी या कलेचा वारसा प्यारेलालजींना दिला नाही. अर्थात त्याने काही फरक पडला नाही. प्यारेलालजी व्हायोलीन वाजवायला शिकले.
लक्ष्मीकांत हे अत्यंत मृदूभाषी, लाघवी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आडनाव कुडाळकर च्या ऐवजी "गोडबोले" शोभलं असतं असं गमतीने म्हटलं जायचं. गरीबीतून वर आले असल्याने शेवटपर्यंत त्यांचे पाय जमीनीवरच होते. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले. एक यशस्वी व्यावसायिक ज्या व्यावसायिक क्लूप्त्या वापरतो त्या सर्व त्यांनी बेधडक पणे वापरल्या. वर्षाला जवळ-जवळ १८-१९ चित्रपटांना संगीत देणे हे आजच्या कॉम्प्युटरच्या जमान्यातही अत्यंत कठीण आहे. पण ते त्यांनी यशस्वीपणे (गाण्यांच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने) निभावले होते. आयुष्याची ५० हुन जास्त वर्षे या मोहमयी दुनियेत काढूनही ते कधी वाहावले नाहीत. प्यारेलालजींशी असलेली व्यावसायिक आणि वैयक्तीक मैत्री त्यांच्या मृत्युपर्यंत टिकली. अर्थात यामागे प्यारेलालजींचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. या दोघांचे स्वभाव एकमेकाला पुरक असे होते. लक्ष्मीकांतजी बोलघेवडे तर प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम - मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल - नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणतात की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही.
आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला. १९४८ च्या "जिद्दी" पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या ए ग्रेड कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. (पारसमणीची गाणी लोकप्रिय असली तरी त्यातले ऑर्केस्ट्रेशन हे काही वेळेला अनावश्यक आहे असं माझं वैयक्तीक मत आहे). हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. जयकिशन यांच्या मृत्युनंतर मात्र शंकर यांनी त्यांना कायम आपले प्रतिस्पर्धी मानले.
संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू मुलांबद्दल विशेष आस्था होती. "दोस्ती" चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. मैत्रीची, स्नेहाची ही अशी उदाहरणे लक्ष्मीकांतजींच्या आयुष्यात जागोजागी सापडतील. आणि अर्थात हा "गिव्ह अँड टेक" मामला असल्याने एल.पी. नी ही केलेल्या सहकार्याचीही उदाहरणे मिळतील. आपल्या जुन्या वादक सहकार्‍यांना फ्री लान्सींगच्या जमान्यातही टिकवून ठेवणे त्यांना बरोबर जमत असे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम (संगीतकार गुलाम महंमद यांचे धाकटे बंधू) हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. ढोलकचा एल्.पी. पॅटर्न लोकप्रिय होण्यामागे या दोन कलाकारांचा सहभाग मोठा आहे. पैकी लाला पाठारी यांनी काही चित्रपटांना लाला-सत्तार (सारंगीवादक) या नावाने संगीत दिले त्या वेळी एल.पीं. नी त्यांच्याकडे निव्वळ वादक म्हणून मेहनताना न घेता काम केलं. डोक्याने थोडा अधू असणार्‍या आणि ईंडस्ट्रीमधे "येडा करीम" म्हणून ओळखला जाणार्‍या अब्दूल करीमला (त्यांना खाँसाहेब हे देखील तोंडदेखलं नाव होतं) देखील त्यांनी असाच सांभाळला. मुळचा खानदानी तबलजी असलेल्या करीमच्या ढोलकने राजा और रंक चित्रपटातल्या "मेरा नाम है चमेली" गाण्यात अशी काही जादू केली आहे की गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर खुद्द लता दिदींनी त्याना तिथल्या तिथे ५०० रुपये बक्षीस दिले होते. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली.
लेखाच्या सुरवातीला मी उल्लेख केलेल्या माझ्या दिवंगत मित्राने सांगीतलेला आणखी एक किस्सा. मी एक दिवस असाच जुनी गाणी ऐकत / पहात बसलो होतो. या माझ्या मित्राला शंकर-जयकिशन म्हणजे देवस्थानी. त्यामुळे अकारण एल्.पी. ना दुय्यम लेखण्याचा त्यांचा प्रयत्न. पण त्यामागे काही लॉजीक होतच. तर झालं असच. "सुनो सजना, पपीहेने कहाँ सबसे पुकारके" हे आये दिन बहार के चं टायटल साँग ऐकताना त्यातल्या बासरीच्या तुकड्यांनी मी भारावलो. आणि एक खवचट विचाराने माझ्या मित्राला फोन लावून त्यांना ते गाणं फोनवर ऐकवलं. आणि विचारलं की तुम्ही एल.पी. ना नेहमी दुय्यम दर्जाचे मानता. आता हे गाणं ऐकल्यावर तरी असं म्हणण्याची ईच्छा तुम्हाला होते का ? यावर माझा मित्र उसळला आणि म्हणाला "अरे, हरीप्रसाद चौरासियांना तीन तास या लक्ष्मीकांत ने स्टुडीओत बसवून ठेवलं होतं, पंडीतजी नया कुछ सुनाओ, नया कुछ सुनाओ म्हणत. शेवटी कंटाळून त्यांनी ही धून ऐकवली. बस, मग काय ? तो लक्ष्मीकांत तर भेळवालाच आहे. बाकीची भेळ त्याने उत्तम जमवली."
हे सगळं जरी खरं असलं तरी देखील माझ्या मनात मात्र माझ्या त्या मित्राईतके एल.पी. ना तुच्छ लेखण्याचे विचार कधीच आले नाहीत. याचं कारण ज्या मासेस नी, सर्वसामान्य रसिकांनी त्यांची गाणी उचलून धरली, वारंवार ऐकली त्यांचाच मी ही एक भाग होतो. त्यांचे सुरवातीचे चित्रपट नविन असताना माझा जन्म झाला नसल्याने मी पाहू शकलो नाही , मी ते रिपीट रन ला बघीतले. पण सरगम रिलीज झाल्यावर "डफली वाले" या गाण्यावर धुंद नाचत थिएटर मधे पैसे उधळणारं पब्लीक मी माझ्या डोळ्यांनी बघीतलय. शेवटी चित्रपट हा एक व्यवसाय आहे. ज्यांची कुवत असते पैसे वाया घालवण्याची ते क्लासेस साठी चित्रपट बनवतात आणि तो पडला तरी उच्चभ्रु वर्तुळात मानाने मिरवतात. पण सुभाष घई, मनमोहन देसाई, बॉबी पासून राज कपूर - यांनी या व्यवसायात राहूनही आम जनतेला रिझवण्याचा प्रयत्न केला. आणि यात त्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनीच खरी साथ दिली.
आजही हिरो मधली ती बासरी, कर्जमधली गिटारची धून, दोस्तीमधले माउथ ऑर्गनचे पीस (जे आर.डी. बर्मन यांनी वाजवले होते) कुठेही ऐकले तरी मान आपोआप डोलायला लागते. तुम्हाला संगीतातले कळो अथवा न कळो, बेसावध क्षणी जे संगीत तुम्हाला डोलायला लावते ते नेहमीच जास्त आपलं वाटतं. आणि हेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं खरं यश आहे. शेवटी "थुंका हुवा चाट-चाट के" या ईंडस्ट्रीत ३५ यशस्वी वर्ष काढता येत नाहीत, ३५०० च्या वरती गाणी देता येत नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मरणानंतर असं किर्तीरूपाने उरता ही येत नाही.
आज दि. २५ मे रोजी लक्ष्मीकांतजींचा १४ वा स्मृतीदिन. त्या निमित्ताने या "आपल्याशा" संगीतकाराला मानाचा मुजरा !
एल.पी. ची माझी आवडती काही गाणी -
तुम गगन के चंद्रमा हो- सती सावित्री (मन्ना डे / लता)
अल्लाह ये अदा कैसी है - मेरे हमदम मेरे दोस्त (यातली सगळीच गाणी आवडती)
मेरा नाम है चमेली - राजा और रंक
खुबसूरत हसीना जानेजां जानेमन - मि. एक्स ईन बाँबे
मेघवा गगन बिच झांके - राजा हरिश्चंद्र (पडद्यावर पृथ्वीराज कपूर आणि हेलन)
मेरे दिवानेपन की भी दवा नही - मेहबूब की मेहंदी
फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर - प्यार किये जा
कोई नजराना लेकर आया हूं मै दिवाना - दो रास्ते
कान्हा, आन पडी मै तेरे द्वारे - शागिर्द
वो है जरा, खफा़ खफा़ - शागिर्द
नजर न लग जायें - नाईट ईन लंडन
मै आया हुं, लेके साज हाथोंमे - अमिर गरीब
सुनो सजना पपीहेंने, कहां सबसे पुकार के - आये दिन बहार के
किसी को पता ना चलें बात का - लुटेरा
ही लिस्ट खरंतर अमर्याद आहे. पण ईथेच थांबतोय. स्मित
*****************************************************
(दिनांक २५ मे २०१२ रोजी मायबोलीवर प्रकाशित ! हा माझा मायबोलीवरचा शेवटचा लेख !)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा